नाराज कार्यकर्त्यांना आघाडीचे चॉकलेट!
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मंजुरीनंतर आता भाजप शहर जिल्हा कार्यकारीणीतील नावे फायनल झाली आहेत. दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कार्यकारणी मंगळवारी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयात कार्यकर्त्यांच्या भरणा असल्याने नाराज झालेल्यांना विविध आघाड्यांमध्ये संधी देण्याचे चॉकलेट देऊन शांत करण्याचा प्रयत्न नेत्यांनी केला आहे.
महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहर कार्यकारिणीवर जास्त मेहनत घेतली आहे. मराठा, ओबीसी, मुस्लिम यासह सर्वच समाज घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. 8 उपाध्यक्ष, 8 चिटणीस, 3 सरचिटणीस तर 1 कोषाध्यक्ष अशा 21 पदाधिकार्यांची निवड अंतिम झाली आहे. यात सात महिला पदाधिकारीही आहेत. तर इतर 40 सदस्य असे मिळून 61 जणांची टीम आता अंतिम झाली आहे. खासदार डॉक्टर भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे आ. अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी कार्यकारिणी जाहीर होणार असल्याचे समजते.
नाराजांना आघाडीचे चॉकलेट!
दरम्यान महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारिणी जाहीर होत असल्याने नाराजांना शांत करण्याचे मोठे आव्हान नेत्यांपुढे आहे. या नाराजांची समजूत घालण्याचे प्रयत्न नेत्यांकडून होत असून नाराजांना भाजप युवा मोर्चा, ओबीसी आघाडी, अल्पसंख्यांक मोर्चा अशा विविध आघाड्यांमध्ये संधी देण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले आहे. दुसरीकडे महिला पदाधिकार्यांनाही संधी देण्यासाठी महिला आघाडीचा पर्याय ठेवण्यात आला आहे.
मंगळवारचा मुहूर्त?
कोरोना संकटामुळे गेली तीन-चार महिने राजकीय कार्यक्रमांवर ब्रेक लागला होता. मात्र आता परिस्थिती काहीशी बदलली आहे. दुसरीकडे राम मंदिर भूमिपूजनानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच मुद्द्यावर भाजपला मोठे जनसमर्थन मिळू शकते, अशी नेत्यांची भावना आहे. त्यामुळे तातडीने कार्यकारणी जाहीर करून कार्यकर्त्यांना कामाला लावावे असे आदेशच वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे बोलले जाते. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारीच कार्यकारिणीची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.