छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी शहरात आलेले भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या दौऱ्यादरम्यान गुरुवारी खळबळजनक प्रकार समोर आला. आ. लाड यांच्या पीएला फोन करून त्यांचे लोकेशन विचारत, ते मुक्कामी असलेल्या हॉटेल परिसरामध्ये संशयास्पद रित्या फिरणाऱ्या दोन मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन्ही कार्यकर्त्यांना पोलीस
आयुक्तालयात नेऊन नजरकैदेत ठेवण्यात आले. मनोज जरांगे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ही खबरदारीची कारवाई केल्याचे समजते.
आ. लाड हे जरांगे यांना भेटण्यासाठी गुरुवारी रात्री शहरामध्ये आले होते. हे समजल्यावर धर्मवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश उगले पाटील आणि योगेश शेळके यांनी आ. लाड यांच्या पीएला फोन केला.
त्यांना भेटण्यासाठी लोकेशन
विचारले. त्यावरून वादंग झाले. हा प्रकार पोलिसांना समजल्यावर रात्री ११ वाजता सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, गुन्हे शाखा निरीक्षक गजानन कल्याणकर हे फौजफाट्यासह आ. लाड मुक्कामी असलेल्या जालना रोडवरील हॉटेल परिसरात गेले. तेथे उगले पाटील आणि योगेश शेळके हे आढळून आले. आ. लाड यांनी शहर सोडेपर्यंत या दोघांनाही नजरकैदेत ठेवले होते. पोलीस आयुक्त प्रवीण पवार हेही या प्रकरणावर विशेष लक्ष ठेवून होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












