पैठण : जायकवाडी नाथसागर जलाशयात पुन्हा एकदा दोन महाकाय मगरी आढळून असल्याने या परिसरात घबराट पसरली असून, वन्यजीव विभागाने या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी मच्छीमार व शेतकर्यांकडून होत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण पैठण तालुक्यातील जायकवाडी येथे बांधण्यात आलेले आहे. या धरणाला कोणत्याही प्रकारची नैसर्गिक साईट नाही. सुमारे 35 हजार हेक्टर याचा परिसर आहे. 2006 मध्ये गोदावरी नदीला आलेल्या प्रलयंकारी महापुरामुळे नाथसागर जलाशयात मोठ्या प्रमाणात मगरी वाहून आल्या आहेत तसेच वन्यजीव विभागाच्या कर्मचार्यांनी इतर ठिकाणी सापडलेल्या मगरी नाथसागर जलाशयात सोडून दिल्या आहेत. नाथसागर जलाशयात गेल्या दहा वर्षांपासून मगरीचे दर्शन होत आहे. मागील दोन वर्षांत तीन ते चार वेळा खुले कारागृह तसेच डावा कालवा परिसरात मगरी शेतकरी व मच्छिमारांना दिसल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मगरी आढळल्या नव्हत्या. मात्र, पुन्हा दोन दिवसांपूर्वी जायकवाडी, खुले कारागृह परिसरात जलाशयात पाण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरामध्ये काही मच्छीमार व शेतकर्यांना दोन महाकाय मगरी आढळून आल्या आहेत.या परिसरात पाणीपुरवठा योजनेचे काम करणार्या मजुरांनी मगरीच्या भीतीपोटी आपला रात्रीचा मुक्काम इतरत्र हलवला आहे. या परिसरात अनेक वेळा मगरी तसेच मगरीची अंडीसुद्धा आढळून आली आहेत.