कन्नड तालुक्यातील चापानेरमध्ये दोन वासरांचा फडशा

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) तालुक्यातील चापानेर, शिवना टाकळी, जळगाव घाट, जैतापूर, आठेगाव आणि जवळी परिसरात उसाचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने येथे बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.

या परिसरात चार ते पाच बिबट्यांचा वावर असल्याचा अंदाज आहे. दोन पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे. जळगाव घाट येथील शेतकरी तातेराव
बारगळ (गट क्र. १५४) यांच्या शेतातील गायीचा तर अंतापूर येथील शेतकरी मुक्तेश्वर बोडखे याच्या शेतवस्तीतील वासराचा बिबट्याने बळी घेतला. 

यामुळे परिसरात तीव्र भीतीचे वातावरण झाले आहे. दरम्यान, शिवना टाकळी मध्यम प्रकल्पामुळे या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा, पिण्याचे पाणी आणि शिकार सहज उपलब्ध होते. सध्या मक्याची सोंगणी आटोपली आहे. ऊसतोड सुरू झाल्याने बिबट्यांना लपण्यास कमी जागा मिळत आहे.

 त्यामुळे ते शेतवस्तीकडे धाव घेत असल्याने शेतातील पाळीव जनावरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे आणि त्याला इतर वनक्षेत्रात सोडावे. अशी मागणी शेतकऱ्याऱ्यांकडून होत आहे.