नाशिक: नाशिकजवळ असलेल्या नांदगाव रेल्वेस्थानकाजवळ आज सकाळी बरेली येथून मुंबईकडे जाणार्या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने हा अपघात घडला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी लांबपल्ल्याची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
हॉलिडे एक्स्प्रेस (गाडी नं.02062) बरेलीहून मुंबईला जात होती. ही गाडी नांदगाव रेल्वेस्थानकावर येत असताना अचानक दोन डबे रुळावरून घसरले. हॉलिडे एक्स्प्रेसच्या चाकाला तडे गेल्याने चाक तुटले होते. यामुळे डबे घसरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चाक तुटले तेेव्हा गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला. चाक तुटलेला डबा वेगळा करण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे मुंबईकडे जाणार्या अनेक एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा झाला असून, वाहतूक सुरळीत होण्यासाठी संध्याकाळपर्यंतचा वेळ लागू शकतो, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.