छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : उस्मानपुर्यात घर फोडून सुमारे ३७ तोळे सोन्यावर डल्ला मारल्याची घटना १३ फेब्रुवारीच्या रात्री घडली होती. त्याच रात्री सातारा परिसरातही दोन घरे फोडल्याचे समोर आले आहे. एका घरातून जवळपास २ तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे शिक्के तर दुसर्या घरातून साडेपाच हजार रुपये रोकड व दुचाकी, असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी शनिवारी (दि.१४) सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अक्षय प्रभाकरराव बाबरे (२९, रा. सैनिक विहार, कांचनवाडी) हे फिर्यादी आहेत. ते खासगी नोकरी करतात. दवाखान्याच्या कामासाठी घराच्या सेफ्टी दरवाजाला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. १३ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजता सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून चोरटे घरात घुसले. त्यांनी बेडरुममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील १० ग्रॅम सोन्याची चेन, ८ ग्रॅमचे मंगळसूत्र, १० ग्रॅम चांदीचे १० शिक्के, असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. १४ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
२० मिनिटांत फोडले घर
गणेशप्रसाद तिवारी (६४, रा. राणा टॉवरजवळ, शिल्पनगर, सातारा परिसर) हे कार्यक्रमानिमित्त पुण्याला गेलेले असताना दोन चोरांनी १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.३५ ते १२.५५ वाजेदरम्यान अवघ्या २० मिनिटांत त्यांचे घर फोडले. कुलूप तोडून घरात घुसलेल्या चोरांनी कपाटातून साडेपाच हजार रुपये रोकड व दारात असलेली मोपेड (एमएच २०, एचआर ०५०६) पळविली. या प्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












