कन्नड, (प्रतिनिधी) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीपोटी दिलेले धनादेश न वटल्यामुळे कर्जदार प्रवीण किसन सासमकर व तुकाराम देविदास जोशी या दोघांना न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली.
सहकारी आदर्श नागरी पतसंस्थेकडून कर्जदार प्रवीण किसन सासमकर व तुकाराम देविदास जोशी या दोन कर्जदारांनी संस्थेच्या चिंचोली शाखा व मुख्य शाखेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीपोटी प्रवीण किसन सासमकर (रा. मु. वाकी, पो. नेवपूर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पतसंस्थेस रु. ६,९१,११७ व तुकाराम देविदास जोशी (रा. बिल्वकुंज अपार्टमेंट, फ्लॅट नं. १४, नागेश्वरवाडी, छत्रपती संभाजीनगर) यांनी पतसंस्थेस रु. १,१५,३०४ चे धनादेश दिले होते. मात्र हे धनादेश न वटल्यामुळे पतसंस्थेने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फुलंब्री न्यायालयात दावे दाखल केले होते.
या दोन्ही प्रकरणांत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. आर. एस. कुलकर्णी यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन्ही आरोपींना दोषी ठरविले. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवीण किसन सासमकर (रा. मु. वाकी, पो. नेवपूर, ता. कन्नड) यांना एक वर्ष सश्रम कारावासाची व धनादेश रक्कम, व्याज व नुकसानभरपाई रक्कम रु. ८ लाख जमा करण्याचा आदेश व रक्कम जमा न केल्यास आणखी दोन महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा अशी शिक्षा सुनावली.
तसेच तुकाराम देविदास जोशी (रा. बिल्वकुंज अपार्टमेंट, फ्लॅट नं. १४, नागेश्वरवाडी, छत्रपती संभाजीनगर यास सहा महिन्यांचा सश्रम कारावासाची व नुकसानभरपाई रक्कम १ लाख २५ हजार जमा करण्याचा आदेश व रक्कम जमा न केल्यास आणखी एक महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी पतसंस्थेची बाजू अॅड. सचिन केशरलाल ढाकरे यांनी मांडली असून, पतसंस्थेतर्फे कर्मचारी शिवाजी विठ्ठलराव कदम यांनी साक्ष नोंदविली.
पतसंस्थेचे प्रशासक समितीचे अध्यक्ष सुरेश काकडे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर सदस्य विष्णू रोडगे व सदस्य विनय धोटे यांनी न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत केले असून, पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी कर्जदारांना लवकरात लवकर कर्ज परतफेड करण्याचे आवाहन केले आहे.










