जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सोमवारी पहाटेपासून सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश- ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात ‘जैश’चा काश्मीरमधील कमांडर कामरानचा समावेश असल्याचे समजते.
पुलवामा येथील पिंगलान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर सुरु झालेली चकमक सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरु होती. सुरक्षा दलांनी दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते ते घर स्फोटकांनी उडवल्याचे समजते. या घरात लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याचे समजते.
मृत दहशतवाद्यांमध्ये जैश- ए- मोहम्मदचा काश्मीरमधील कमांडर कामरानचा समावेश असल्याचे समजते. कामरान हा पाकिस्तानचा नागरिक असून तो जैशचा कमांडर होता. या हल्ल्यात मृत्यू झालेला दुसरा दहशतवादी हा पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा मास्टरामाइंड अब्दुल गाझी असल्याचे समजते. गाझी हा मसूद अझहरचा निकटवर्तीय आहे. मात्र, या वृत्ताबाबत अद्याप सुरक्षा दलांनी दुजोरा दिलेला नाही.
चकमकीत मेजरसह 4 जवान शहीद...
पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 4 भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. शहिदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले. त्या दरम्यान झालेल्या चकमकीत 4 भारतीय जवानांना वीरमरण आले. चकमकीदरम्यान एका नागरिकाचाही मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल्स , सीआरपीएफ आणि एसओजीच्या जवानांनी मध्यरात्रीनंतर परिसराला घेरले. हे लक्षात येताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करायला सुरू केले. यात मेजरसह 5 भारतीय जवान शहीद झाले. शहिदांमध्ये मेजर डी. एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल सावे राम, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरी सिंग यांचा समावेश आहे. मात्र गेल्या तीन तासांपासून दोन्ही बाजूंनी गोळीबार बंद झालेला असून, भारतीय जवानांनी शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. भारतीय जवानांनी घेरलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद याच संघटनेचेच आहेत. हे सर्व दहशतवादी आदिल अहमद डार याचेच सहकारी असल्याची माहिती मिळते आहे. भारतीय जवानांनी पिंगलान परिसराला सर्व बाजूंनी घेरले आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आली आहे. चारच दिवसांपूर्वी, 14 फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र देण्यात आले.