दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच असून  अवघ्या २४ तासांच्या अंतरात दोन वृद्ध महिलांना लक्ष करून दुचाकीवर आलेल्या चोरांनी सोन्याचे दागिने ओरबाडून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पहिली घटना सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी भागात घडली. गंगूबाई अशोक काळे (५५) या एन-२ ग्राऊंडवर मॉर्निंग वॉक करून घरी परतत होत्या. न्यू एसटी कॉलनीजवळील रोडवर काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील १९ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या झटापटीत महिलेच्या मानेला झटका बसून त्या किरकोळ जखमी झाल्या. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरण्यनगरमध्ये संध्याकाळी फिरताना लूट
दुसरी घटना मंगळवारी (दि. २४) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास हिरण्यनगर, उल्कानगरी भागात घडली. अलका वसंतराव माळी (६०) त्यांच्या मैत्रिणीसोबत फिरत असताना बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण बँकेजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण तोडून पोबारा केला. अवघ्या १० मिनिटांच्या अवधीत चोरट्यांनी ही हातसफाई केली. यातील आजीचे नुकतेच ऑपरेशन झाले होते. त्यांना डॉक्टरांनी चालण्याचा सल्ला दिला होता. मात्र चोरट्यांनी साखळी हिसकावल्याने त्या खाली पडल्याने त्या जखमी झाल्या.