छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): राज्यातील इंधन चोरी आणि अवैध साठेबाजी करणाऱ्या विरोधात राज्यस्तरीय दक्षता पथकाने झिरो टॉलरन्स धोरण अवलंबत काल एक मोठी कारवाई केली. गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवार परिसरात गॅस चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले असून, यात 1 कोटी 26 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचे गांभीर्य स्पष्ट करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेला गॅस साठा तब्बल 2 हजार 480 गरीब कुटुंबांची महिनाभराची गरज भागवू शकला असता. गॅस माफिया स्वतःच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांच्या हक्काच्या इंधनाचा काळाबाजार करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या रॅकेटचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा सखोल तपास आता पोलीस यंत्रणेमार्फत केला जात आहे. अवैध साठेबाजी आणि जीवनावश्यक वस्तूंची चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल. असे राज्यस्तरीय दक्षता पथकाने स्पष्ट केले आहे.
कारवाईचा थरार: रंगेहात पकडले गॅस चोर
नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पथक प्रमुख गणेश बेल्लाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैजापूर रोडवरील हॉटेल साईयश जवळील मोकळ्या जागेत सापळा रचला. 2 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एच.पी. कंपनीच्या एलपीजी टँकरचे सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅसची चोरी सुरू असताना पथकाने धाड टाकली आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले.
1 कोटी 26 लाख रुपयांचा साठा जप्त
जप्त केलेल्या मालात दोन महाकाय टँकर: क्र.एमएच 43 के 5921 आणि एमएच 43 सीके 5747 (एकूण 35,220 किलो गॅस) पकडले. त्यात सिलेंडर साठा व्यावसायिक 19.2 किलो एवढा साठा होता. तर घरगुती 14.2 किलो असा एकूण 26 सिलेंडरचा अवैध साठा आढळून आला. असे एकूण अंदाजे 1 कोटी 26 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.