ऊसतोडीदरम्यान थकून रस्त्याकडेला झोपलेल्या दोन सख्ख्या भावांना जेसीबीने चिरडले

Foto
परभणी : परभणी तालुक्यातील पोरवड येथे शनिवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास  दुर्दैवी घटना घडली. ऊसतोड सुरू असताना जेसीबी यंत्राखाली चिरडून दोन सख्ख्या शेतकरी भावांचा जागीच मृत्यू झाला. परमेश्वर अशोक गीराम (वय ३५) आणि नवनाथ अशोक गीराम (वय ३३, रा. पोरवड, ता. परभणी) अशी मृत पावलेल्या भावांची नावे आहेत. या घटनेमुळे पोरवडसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ  स्वतःच्या शेतामध्ये ऊस तोडीच्या कामामध्य दिवसभर  व्यस्त होते तसेच रात्रीही यंत्राच्या साह्याने ऊस तोडी चालू असल्यामुळे या सततच्या कामामुळे प्रचंड थकवा आल्याने दोघांनी माळसोना रोडलगत डोके टेकवून विश्रांतीसाठी झोप घेतली.

दरम्यान, तोडलेला ऊस ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम जेसीबी यंत्राच्या साहाय्याने सुरू होते. याचवेळी उसाच्या फडातून ऊस घेऊन आलेले हे यंत्र ट्रॉलीमध्ये ऊस टाकण्यासाठी रिव्हर्स (मागे) येत होते. अंधारात रोडच्या कडेला झोपलेल्या दोन्ही भावांकडे चालकाचे लक्ष न गेल्याने जेसीबी यंत्राने त्यांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, या दुर्घटनेत दोन्ही भावांचा जागीच करुण अंत झाला.

पोरवड गावावर शोककळा 
दिवसभर स्वतःच्या शेतात घाम गाळून रात्रीही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करणार्‍या दोन तरुण भावांचा अशा दुर्दैवी पद्धतीने अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने गीराम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दैठणा पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी 
सध्या परिसरात ६० ते ७० टक्के ऊसतोड ही यंत्रांच्या साहाय्याने होत असल्याने रात्रीच्या वेळी चालणार्‍या या कामादरम्यान सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या घटनेने ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. सोनेत, पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.