जमीन विक्रीच्या बहाण्याने ५० लाखांची फसवणूक दिल्लीगेट परिसरातील दोघांवर गुन्हा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जमीन विक्रीचा व्यवहार करून फिर्यादीकडून तब्बल ५० लाख रुपये उकळले, मात्र जमिनीचा ताबा न देता आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिल्लीगेट आणि रोजाबाग परिसरातील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फसवणुकीचा प्रकार ९ ऑगस्ट २०२५ पासून घडला होता. आरोपी शेख इरफान अजहर (वय ३७, रा. सलमान हॉल, दिल्लीगेट) आणि शेख जमील शेख गुलाम रसुल (वय ३२, रा. रोजाबाग, आझाद कॉलेजजवळ) यांनी संगनमत करून फिर्यादीसोबत हिमायतनगर येथील गट क्रमांक १९/१ मधील ५ आर जमीन विक्रीचा व्यवहार ठरवला होता. शनिवारी (दि.१६) वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
▶ या व्यवहारापोटी आरोपींनी फिर्यादीकडून आरटीजीएस आणि रोख स्वरूपात एकूण ५० लाख रुपये स्वीकारले. रक्कम घेतल्यानंतर त्यांनी मुखत्यारनामा (पावर ऑफ अॅटर्नी) करून दिला, परंतु जमिनीचा प्रत्यक्ष ताबा देण्यास टाळाटाळ केली. फिर्यादीने जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी वारंवार तगादा लावला असता, आरोपींनी जमीन देण्यास नकार दिला आणि घेतलेले ५० लाख रुपयेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions