पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोने दोघांनी चोरले...! माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळ पोलिसांकडून तातडीने कारवाई

Foto
काठमांडू: एकीकडे नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात महापुराने थैमान घातले असून हाहाकार उडाला आहे, तर दुसरीकडे या भीषण नैसर्गिक आपत्तीच्या काळात माणुसकीला काळीमा फासणार्‍या एक संतापजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाला आहे. नारायणी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका महिलेच्या मृतदेहावरून तिचे सोन्याचे कानातले चोरणार्‍या दोन नराधमांना नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान या आपत्तीत आतापर्यंत सुमारे ४०० (३९२) लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १,४०० पेक्षा जास्त लोक अजूनही बेपत्ता आहेत. या पुरात अनेक भारतीय नागरिकही अडकले असून, भारत सरकार आपल्या सुमारे २९० बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहे. रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे तसेच १.५ मीटरपेक्षा जास्त चिखल साचल्याने बचाव पथकांना बाधित क्षेत्रांपर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. निसर्गाच्या या प्रलयादरम्यान समोर आलेल्या या घृणास्पद घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे.

सोशल मीडियावर ४१ सेकंदांचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दोन पुरुष एका महिलेचा मृतदेह लाकडाच्या साह्याने आणि मृतदेहाचे केस धरून पाण्याबाहेर ओढताना दिसत आहेत. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते तिच्या दोन्ही कानांत सोन्याचे कानातले काढून बाजूला ठेवतात. संतापजनक बाब म्हणजे, तिथे उपस्थित असलेले अनेक लोक हे सर्व शांतपणे पाहत होते आणि काही जण मोबाईलमध्ये याचे शूटिंग करत होते. व्हिडिओ इंटरनेटवर पसरताच नेटकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी झाली.

पोलिसांची तत्पर कारवाई आणि अटक
व्हिडिओची गंभीर दखल घेत नेपाळ पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. चितवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह नारायणी नदीच्या पुरात वाहून आला होता. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी मदन गुरुंग (वय २५) आणि उमेश चौधरी (वय ३८) या दोन संशयितांची ओळख पटवली. भरतपूर महानगरपालिका-१ मधील पोखरा बस पार्कजवळून गुरुवारी या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
आपत्तीच्या या कठीण काळात अशा प्रकारे पीडितांची लूट करणे किंवा कोणतेही अमानुष कृत्य करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.