नागपूर : नागपूर-भंडारा महामार्गावर शनिवारी एक मन सुन्न करणारी घटना घडली. एका घरगुती कार्यक्रमासाठी उत्साहाने निघालेल्या दोन बहिणींवर भरधाव वाहनाने झडप घातली. महालगाव जवळील नाग नदीच्या पुलावर झालेल्या या भीषण अपघातात दोन चुलत बहिणींचा करुण अंत झाला. यामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नागपूरच्या पिपळा डाक बंगला परिसरात राहणार्या अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या दोघी बहिणी दुचाकीने भुगाव येथे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या. भर दुपारी नाग नदीच्या पुलावरून जात असताना पाठीमागून येणार्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जास्त होती की, अलिशा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मोनाली यांचा रुग्णालयात नेताना वाटेतच अखेरचा श्वास घेतला.
या अपघातातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे या मृतांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण होते. अलिशा यांचा विवाह अवघ्या ७ महिन्यांपूर्वी झाला होता. त्या संसाराची नवी स्वप्ने पाहत होत्या. तर दुसरीकडे, मोनाली यांचा विवाह येत्या २६ फेब्रुवारीला निश्चित झाला होता. त्यांच्या घरात लग्नाची खरेदी, नातेवाईकांना निमंत्रण देण्याची लगबग सुरु होती. घरात आनंदाचे वातावरण असतानाच या अपघाताने दोन्ही घरांचे हसते-खेळते अंगण एका क्षणात उजाड केले.
या अपघातानंतर महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही धडक देऊन पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. लग्नाच्या गाठी बांधल्या जाण्यापूर्वीच काळाने घातलेल्या या घावामुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.