फुलंब्री, (प्रतिनिधी) : कंपनीतील शिफ्ट संपवून दुचाकीने घरी परतत असताना कंटेनरला पाठीमागून धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली.
ही घटना छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील सटाणा फाटा येथे रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली. सजन सुगनलाल बिमरोट (३५. रा. नागोणीची वाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिमरोट हे एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होते. रविवारी दिवसभराची शिफ्ट पूर्ण करून ते रात्री दुचाकीने (क्र. एमएच २० डीडब्ल्यू ५५९३) जालना महामागनि आपल्या घरी जात होते. करमाड जवळील सटाणा फाटा परिसरात रस्त्यावर उभा असलेला कंटेनर त्यांच्या निदर्शनास न आल्याने त्यांच्या दुचाकीची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक बसली.
या अपघातात बिमरोट यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते घटनास्थळी बेशुद्ध पडले. अपघाताची माहिती मिळताच जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक बाळू कातखडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांच्या मदतीने जखमीला त्वरित छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार संतोष चव्हाण व दादासाहेब ढवळे करीत आहेत.











