दिवाळीआधीच अमेरिकेने भारतावर टाकला टॅरिफ बॉम्ब... ट्रम्पकडून १०० टक्के टॅरिफ कायद्याला मंजुरी...देशाच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही, भारत मात्र आपल्या भूमिकेवर ठाम !

Foto
नवी दिल्ली :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रशिया आणि इराणवरील निर्बंध कायदा, २०२६ या नव्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. या कायद्यांतर्गत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणार्‍या पहिल्या ५ प्रमुख देशांवर अमेरिका १०० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त टॅरिफ अर्थात आयात शुल्क लावणार आहे. चीनसोबतच भारत हा रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणार्‍या टॉप ५ देशांमध्ये समाविष्ट असल्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयाचा थेट फटका भारताला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ट्रम्प यांनी या विधेयकावर स्वाक्षरी करून त्याचे कायद्यात रूपांतर केले आहे. अमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या प्रतिनिधीगृहाने, रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणार्‍या पाच देशांवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क लावणारे विधेयक मंजूर केले. या विधेयकाच्या बाजूने २६२ आणि विरोधात १५९ मते पडली. सिनेटने ऑगस्टमध्ये ८६-११ मतांनी हे विधेयक मंजूर केले होते. याचे अधिकृत नाव लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण अ‍ॅक्ट ऑफ २०२६ असे आहे. रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल खरेदी करणार्‍या पाच देशांच्या अमेरिकन यादीत चीन, भारत, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि अझरबैजान यांचा समावेश आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ४० टक्क्यांपेक्षा जास्त तेल रशियाकडून खरेदी करतो.

अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी  दर १८० दिवसांनी या यादीचे मूल्यांकन करतील. अमेरिकेने लावलेल्या १०० टक्के शुल्काबाबत, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की देशाच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर, भारताने रशियाकडून स्वस्त कच्च्या तेलाची खरेदी वेगाने वाढवली. २०२२-२३ मध्ये रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला. युद्धापूर्वी, भारत रशियाकडून खूप कमी तेल खरेदी करत असे, परंतु नंतर हा आकडा दररोज अंदाजे १.६ ते २ दशलक्ष बॅरलपर्यंत वाढला. आता, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ४० टक्क्यांपेक्षा जास्त तेल रशियाकडून आयात करतो. यामुळे भारत रशियाकडून तेल खरेदी करणार्‍या सर्वात मोठ्या देशांपैकी एक बनला आहे.

रशियाव्यतिरिक्त भारतासाठी ९ पर्याय
रशिया व्यतिरिक्त, भारत प्रामुख्याने इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवेत आणि कतारकडून तेल खरेदी करतो. तसेच तो नायजेरिया, अंगोला, ब्राझील आणि अमेरिकेकडूनही कच्च्या तेलाची आयात करतो.

कोणत्या गोष्टी महाग होणार?
जर अमेरिकेने भारतावर १०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादले, तर अमेरिकेच्या बाजारात भारतीय वस्तूंचेही भाव दुप्पट होतील. याचा सर्वाधिक फटका भारताच्या निर्यात क्षेत्राला बसू शकतो.
सुती कापड आणि रेडिमेड कपडे-अमेरिकेत भारतीय तयार कपडे आणि सुती कापडाची मोठी मागणी आहे. टॅरिफमुळे हे कपडे अत्यंत महाग होतील.
दागिने आणि हिरे: सुरत आणि मुंबईतून अमेरिकेत निर्यात होणारे पैलू पाडलेले हिरे आणि सोन्या-चांदीचे दागिने महाग होतील.
औषधे: भारतीय जेनेरिक औषधांचा अमेरिकन बाजारात मोठा वाटा आहे, त्यावर टॅरिफ लागू झाल्यास औषधांचे भाव वाढतील.
सी-फूड: भारतातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निर्यात होणारे कोळंबी आणि इतर सी-फूड महाग होईल.
इंजिनिअरिंग वस्तू आणि ऑटो पार्ट्स: वाहनांचे सुटे भाग आणि मशिनरीच्या निर्यातीवर याचा थेट परिणाम होईल.
भारतात कशावर आणि कसा परिणाम होऊ शकतो?
निर्यातदार आणि रोजगारावर येऊ शकते गदा : भारतीय वस्तू महाग झाल्यामुळे अमेरिकन खरेदीदार इतर देशांकडे म्हणजेच व्हिएतनाम, बांगलादेशकडे वळू शकतात. यामुळे भारतातील निर्यातदार कंपन्यांचे नुकसान होऊन उत्पादन आणि रोजगारावर परिणाम होऊ शकतो.
पेट्रोल-डिझेलचे भाव: अमेरिका दबाव आणत असली तरी भारताने रशियन तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. जर भारताने दबावापोटी रशियाकडून स्वस्त तेल घेणे बंद केले, तर भारताचा आयात खर्च वाढून देशांतर्गत बाजारात इंधन महाग होऊ शकते.