मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांनुसार पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी संपर्कप्रमुखांच्या अधिकृत नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, राज्यातील ४८ पैकी ४० लोकसभा मतदारसंघांत हे संपर्कप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत.
पक्षाने आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखत तरुणांसह मुंबईतील आमदार, नगरसेवक व वरिष्ठ पदाधिकार्यांना जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघ, ठाणे आणि जळगाव वगळता उर्वरित मतदारसंघांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय लोकसभा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख्याने नितीन बानुगडे-पाटील (जिल्हे सातारा, सांगली), सुषमा अंधारे (सोलापूर लोकसभा, माढा लोकसभा), आशीष चेंबूरकर (छत्रपती संभाजीनगर लोकसभा), सुनील वामन पाटील (जालना लोकसभा), सुनील काटमोरे (धाराशीव लोकसभा), किशोर पोतदार ( नांदेड लोकसभा), प्रदीपकुमार खोपडे (परभणी लोकसभा), परमेश्वर सातपुते (लातूर लोकसभा), अशोक सकपाळ (बीड लोकसभा) अशा या नियुक्त्या आहेत.