उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून थेट एबीफॉर्म वाटप, मनसेची ठाण्याची यादी जाहीर

Foto
मुंबई :  मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आतापर्यंत कुठलीही यादी जाहीर केलेली नाही. मात्र आतापर्यंत ९० जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यातील ४२ जणांची नावे समोर आली आहेत. राज आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे भावांनी २४ डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला आली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आता मठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे. मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी ११४ हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना (महायुती) एकत्र लढणार आहे.  त्यामुळं या निवडणुकीत बहुमताचा म्हणजेच ११४ जागांचा जादुई आकडा कोण गाठणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. 

मनसेची ठाण्याची यादी जाहीर 

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यासाठी लगबग सुरु आहे. ठाण्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि मनसे एकत्रितरित्या निवडणूक लढवत आहेत. मात्र, ठाण्यातील या आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. तरीही मनसेने त्यांच्या निश्चित झालेल्या २४ जागांवरील उमेदवारांना रविवारी रात्री एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे. या उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यापैकी सात उमेदवारांची नावं समोर आली आहेत.