उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा संवाद दौरा; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळी अगोदर देण्याचे आश्‍वासन देऊन हा आनंदमय सण गोड करण्याचे अभिवचन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. दिवाळी होऊन आठवडा सरला असला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात  हे नुकसान भरपाईचे अनुदान न मिळल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण मराठवाडा दौरा करणार आहे. दगाबाज रे.. या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान शेतकर्यांशी साधणार संवाद आहेत. शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून या संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

माजी विरोधीपक्षनेते दानवे म्हणाले की, निवडणूक आयोगाविरोधात काल मुंबईत आयोजित मोर्चात राजकीय पक्षासोबत सामान्य जनताही मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. यातून जनतेचा रोष दिसून आला. या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाला भाजपने प्रती आंदोलन केले मात्र ते झाकोळल्या गेले.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने 31 हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा केली. दिवाळीपूर्वी ते पॅकेजचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार होते. मात्र सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयाही दिला नाही. शिवाय जमीन खरडून गेली, घरेदारे वाहून गेली त्याची मदत अद्याप मिळाली नाही.

गेल्या महिन्यात आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर मोर्चा काढला होता.  तेव्हा ठाकरे यांनी पॅकेजचे काय झाले हे पहायला दिवाळीनंतर पुन्हा  येईल, असे सांगितले होते. त्यानुसार ठाकरे हे दि.5,6,7 आणि 8 नोव्हेंबर रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यांवर येणार आहेत.  या दौऱ्याची सुरवात बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होईल. या दौऱ्यात ते सुमारे 34 तालुक्यातील विविध  गावांत  शेतकऱ्यांशी संवाद साधतील असे दानवे यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला उपनेते सुभाष पाटील, राजू वैद्य,सुकन्या भोसले आदी उपस्थित होते.
 
हारतुरे, मंच नसेल....

ठाकरे यांच्या मराठवाडाशेतकरी संवाद दौऱ्यात कोठेही हारतुरे नसेल. शिवाय कोठेही मंच उभारला जाणार नाही, ते वाड्यावर, चावडीवर शेतकऱ्यांशी संवाद साधतील,असे दानवे यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ,  सर्व खासदार, उपनेते, संपर्कप्रमुख यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी होतील, असे दानवे यांनी सांगितले.

याप्रसंगी शेतकरी बांधवांनी व शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, लक्ष्मणराव वडले, ज्योतीताई ठाकरे, सचिन घायाळ, रोहिदास चव्हाण, परशुराम जाधव, सुनील काटमोरे, आमदार राहुल पाटील, कैलास पाटील, प्रविण स्वामी, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड,भास्कर आंबेकर, महेश नळगे, गणेश वरेकर, उल्हास गिराम, गंगाप्रसाद आणेराव,रविंद्र धर्मे, रणजीत पाटील, संदेश देशमुख, गोपु पाटील, ज्योतीबा खराटे, बबन बारसे व भुजंग पाटील यांनी केले आहे.