मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९ पैकी ६ लोकसभा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. हे ६ बंडखोर खासदार स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सावध पवित्रा घेत आपल्या सर्व खासदारांसाठी ‘पक्षादेश’ (व्हिप) जारी केला आहे.
६ खासदार दिल्लीत; ‘पक्षांतर बंदी कायदा’ टाळण्याची रणनीती?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी दावा केला आहे की, ठाकरे गटाचे ६ खासदार आधीच दिल्लीत पोहोचले आहेत. या खासदारांनी गुरुवारी सकाळीच लोकसभा अध्यक्षांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्याचे नियोजन केले होते, मात्र आता ही भेट संसदेत होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे लोकसभेत एकूण ९ खासदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी किमान दोन-तृतीयांश म्हणजेच ६ खासदारांची आवश्यकता असते. त्यामुळे जर हे ६ खासदार एकत्र बाहेर पडले, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही, अशी रणनीती आखली गेल्याचे समजते.
या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,
“१४ जून रोजी झालेल्या बैठकीत सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला होता. मात्र, सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये ज्या पद्धतीने बातम्या फिरत आहेत, ते पाहता आपल्याला सावध राहावे लागेल. आम्ही लोकसभा अध्यक्षांना या संदर्भात एक निवेदनही सादर केले आहे.” ठाकरे गटाच्या संसदीय मंडळाची गुरुवारी (१८ जून) एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या कथित बंडखोर खासदारांच्या पुढील पाऊलानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
‘अपना सपना मनी मनी!’: संजय राऊतांचा ५० कोटींचा गंभीर आरोप
या संभाव्य फुटीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत विरोधकांवर तोफ डागली आहे. खासदार फोडण्यासाठी तब्बल ५० कोटींची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
संजय राऊत यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले आहे की, “अपना सपना मनी मनी! प्रत्येक खासदारासाठी किमान ‘समर्थन मूल्य’ ५० कोटी रुपये ठरवण्यात आले आहे. त्यापैकी १५ कोटी रुपये तर अॅडव्हान्स म्हणून दिले जात आहेत. खरं सांगायचं तर, या लोकांची लायकी ५० हजार रुपयांचीही नाही. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस (TMC) सारख्या ब्रँडमुळेच यांची किंमत वाढली आहे.”
ठाकरे गटाचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत यांनीही या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “देशात लोकशाहीचा पुरता बाजार मांडला गेला आहे. ज्यांच्यावर स्वतः पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच मुख्यमंत्री बनवले जाते. संविधानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. पक्ष हा शेवटी पक्षच असतो. काही खासदार किंवा आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे,” असे सावंत म्हणाले.
पक्षाशी प्रामाणिक राहणार: खासदार भाऊसाहेब वाकचौरे
दरम्यान, या संपूर्ण वादात ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “माझ्याशी शिंदे गटातील कोणत्याही नेत्याने संपर्क साधलेला नाही. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे आणि पुढेही राहीन,” असा विश्वास वाकचौरे यांनी व्यक्त केला आहे. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक आता दिल्लीच्या दरबारात रंगण्याची चिन्हे असून, गुरुवारी होणाऱ्या लोकसभा अध्यक्षांच्या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.