छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : बँकेने जप्त केलेल्या घराचा ताबा मिळवून देण्यासाठी आलेल्या दोघांनी अप्पर तहसील कार्यालयात धुडगूस घालत दिव्यांग सहायक महसूल अधिकाऱ्याला ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गुरुवारी (दि.२०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अधिकाऱ्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉबी राधेशाम अग्रवाल आणि अनिकेत कृष्णा भंडारी (दोघे रा. जालना) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पडेगाव येथील रहिवासी व फिर्यादी दिव्यांग अधिकारी विजय चंद्रभान सरोवर (४८) हे गुरुवारी कार्यालयात नायब
तहसीलदार अरुण पहुरे, जितेंद्र जाधव, रामदास मोगल व इतर कर्मचाऱ्यांसोबत शासकीय कामकाज करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी वडगाव कोल्हाटी येथील जप्त घर ताब्यात देण्यासाठी सोबत चालण्याचा तगादा लावला. कारवाईसाठी नियुक्त मंडळ अधिकारी अभिलाषा म्हस्के शासकीय कामासाठी बाहेर असल्याने दोन्ही अधिकारी उपस्थित असणे नियमानुसार अनिवार्य असल्याचे सरोवर यांनी आरोपींना समजावून सांगितले. याचा राग आल्याने आरोपी बॉबी अग्रवाल याने तुझीच काठी तुझ्या डोक्यात मारीन अशी धमकी देत मारहाण सुरू केली. यात सरोवर यांच्या मेंदूला मार लागल्याने त्यांना सीटी स्कॅनचा सल्ला दिला. सरोवर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ पुढील तपास करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions













