नगरसेविकांच्या पतींच्या उपस्थितीवरून चर्चेला उधाण
गंगापूर, (प्रतिनिधी): नगर पालिकेच्या सभागृहात तब्बल चार वर्षांनंतर सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गंगापूर शहराच्या लोकविकासावर विशेष भर देत विविध विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
या सर्वसाधारण बैठकीत स्वच्छालय बांधकाम तसेच इतर अनेक विकासकामांबाबत विषय मांडण्यात आले. हे सर्व विषय जनतेच्या हितासाठी मंजूर करण्यात आले असून, शहरातील विकासकामे लवकरात लवकर मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
येथे नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष अमोल जगताप आणि मुख्याधिकारी संतोष आगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ही नवीन कार्यकाळातील सर्वसाधारण बैठक असल्याचेही नमूद करण्यात आले. बैठकीस नगरसेवक फैसल चाऊस, सुरेश नेमाडे, गटनेते संतोष अंबिलवादे, सय्यद अख्तर, राकेश कळसकर, वर्षा विशाल गायकवाड, नवनाथ कानडे, तहरी मुनाफ कुरेशी, सोपान देशमुख, योगेश पाटील, सलमानजीन अनिस कुरेशी, विजय पानकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान गंगापूर नगर पालिकेची चार वर्षांनंतर झालेली सर्वसाधारण बैठक शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. मात्र, बैठकीदरम्यान काही नगरसेविका पतींसह तर काही ठिकाणी केवळ पतीच उपस्थित दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण झाला.
-- विविध विकासकामांवर चर्चा --
नगर पालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. गंगापूर शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच नागरी सोयीसुविधा वाढविण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित केली.
---विकासाला चालना देण्याचा संकल्प ---
चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या सर्वसाधारण बैठकीतून गंगापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून, पुढील काळात या निर्णयांची अंमलबजावणी कशी होते याकडे गंगापूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.














