फडणवीसांच्या कारकीर्दीत मुंबई, महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र झालाय; संजय राऊतांचा घणाघात

Foto
मुंबई  : महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. एकूण ५४० सदस्यांपैकी ५२८ सदस्यांनी मतदान केले. विधेयकाच्या बाजूने २९८ आणि विरोधात २३० मतं नोंदवली गेली. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच महाराष्ट्रातील वाढत्या ड्रग्जच्या प्रकरणावरूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. 

संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन आमचा निषेध करणार आहेत. तुम्ही स्वतःचाच निषेध करा. मी काल म्हणालो की, पंतप्रधानांनी या देशाची माफी मागायला पाहिजे. उद्या देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात काही चुकीचे विधान केले तर त्यांना देखील माफी मागावी लागेल. २०२३ साली सर्वानुमते मंजूर झालेला कायदा जो तुम्ही लागू केलेला आहे, राष्ट्रपतींनी त्यावर सही केलेली आहे आणि आता तुम्ही कसले डमरू वाजवत बसलेले आहात? तुम्ही कोणाला फसवत आहात? मग २०२३ सालच्या ट्विट बद्दल देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे की माझं ट्विट खोटं आहे, असा हल्लाबोल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 
 
मग आता का फडफडत आहात? 
संजय राऊत पुढे म्हणाले की, महिला आरक्षणासंदर्भात तुम्ही जे मिस कॉल दिले, त्याला आम्ही सर्वांनीच पाठिंबा दिला. कारण तुम्ही २०२३ सालचा तो कायदा लागू केला होता ना. मग आता का फडफडत आहात? तुमची नेमकी समस्या काय आहे? तुम्हाला कोणता मानसिक आजार जडला आहे? हे आम्हाला कळू द्या. या लोकांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार झालेला आहे. पंतप्रधान खोटं बोलतात. मग गृहमंत्री खोटं बोलतात, त्यानंतर राज्यातील मुख्यमंत्री खोटं बोलतात. मग त्यांच्या पक्षाची नारी शक्ती खोटं बोलते, हा आजारच आहे, असे त्यांनी म्हटले. 
 
 निवडणूक आयोग लोकशाहीला फा मारतो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जे संबोधित केले. त्यावर विरोधी पक्षाकडून आचारसंहिता भंगाचा आरोप केला जात आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्ष तक्रार करणार का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग त्यांचे हस्तक आहे. ज्ञानेश कुमार यांना डीलिमिटेशन आयोगाचे अध्यक्ष करणार होते. त्यांच्या घरी भाजपाचा झेंडा फडकत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आम्ही कोणती अपेक्षा करणार? निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारी आहे. निवडणूक आयोग लोकशाहीला फा मारतो. भारताचा निवडणूक आयोग हा भाजपचा निवडणूक आयोग झालेला आहे. तो संविधान आणि लोकशाहीला फा मारतो, असा म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.
 
 महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र झाला
संजय राऊत पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत मुंबई, महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र झाला आहे. आधी उडता पंजाब होता, बरेच काही उडत होते. सध्या महाराष्ट्राच्या राजधानीची अवस्था ही ड्रग्स कॅपिटल म्हणून झाली आहे. महाराष्ट्रात काय काय उडतंय, इकडे खरात बाबा उडतोय. तिकडे अजून काय उडतंय. तुम्ही आंदोलन काय करताय फडणवीस? या सगळ्याकडे लक्ष द्या. तरुण पिढी बरबाद होत आहे. नारीवंदन तुम्ही करत आहात. यावर कारवाई करा तुम्हाला या माता भगिनींचे पुण्य लागेल, असे देखील त्यांनी म्हटले.