डिलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागांमध्ये सरसकट ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय

Foto
नवी दिल्ली : मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत मंजूर करून घेण्यासाठी कंबर कसून तयार झालेल्या केंद्र सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. तसेच मंत्रिमंडळाने नव्याने मान्यता दिलेल्या विधेयकामधून प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागांमध्ये सरसकट ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या वाढलेल्या जागांमुळे लोकसभेतील सभासद संख्या सध्याच्या ५४३ वरून वाढून थेट ८१५ एवढी होणार आहे.

मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारने १ ते ३ डिसेंबरदरम्यान, संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या या दोन विधेयकांच्या मंजुरीसाठी लोकसभा आणि राज्यसभेत मतदान होणार आहे. तत्पूर्वी आज झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

विरोधकांनी सूचवलेल्या दुरुस्त्या केल्या मान्य
दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाला मान्यता देताना केंद्रीय मंत्रिमंडळाने विरोधकांनी सूचवलेल्या काही दुरुस्त्यांचा स्वीकार  करत त्यातत काही महत्त्वाचे बदल केले आहे. आता लोकसभेत नव्याने मांडण्यात येणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकामधील तरतुदीनुसार देशातील प्रत्येक राज्यामधील लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये सरसकट ५०  टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे लोकसभेतीव मतदारसंघांची संख्या वाढून ती ८१५ पर्यंत पोहोचणार आहे. याबरोबरच द्रमुकसह काही विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार यापुढची २५ वर्षे डिलिमिटेशन गोठवण्याचा निर्णयही आज झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या या बैठकीमधून घेण्यात आला आहे.