आडगाव सरक येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून दुष्काळाची पाहणी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव सरक येथे दुष्काळी शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाअभावी नुकसान झालेल्या कपाशी, बाजरी व मका या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांकडून पिकांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.

आठवले यांनी शेतकरी काशिनाथ मोकळे यांच्या एक हेक्टर क्षेत्रातील पिकांची पाहणी केली. जून-जुलैमध्ये
पेरणी केल्यानंतर बियाणे, औषधे व शेतीच्या मशागतीसाठी खर्च करूनही पावसाअभावी पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. कपाशीच्या पिकाला पूर्वी एका फांदीला २५ बोंडे लागत असत; मात्र यंदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर्वी एकरी सुमारे १० क्विंटल उत्पादन मिळत असे. त्यातून सुमारे ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. यंदा मात्र एकरी ५० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च होऊनही उत्पादन मिळण्याची
शक्यता नसल्याचे शेतकरी काशिनाथ मोकळे यांनी सांगितले.

पावसाअभावी कपाशी, बाजरी, मका, तूर व इतर पिकांची अवस्था बिकट झाली आहे. शेतातील उभी पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आठवले यांनी शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण, तहसीलदार शिवानंद बिडवे व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.