काकासाहेब तांगडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान; शेतकरी वर्गात तीव्र संताप
पैठण, (प्रतिनिधी) तालुका पैठण अंतर्गत दावरवाडी शिवारातील गट नंबर ५१७, १ मधील शेतकरी काकासाहेब रामराव तांगडे यांच्या चार एकर क्षेत्रावरील तुरीच्या पिकाला अज्ञात समाजकंटकांनी रात्री आग लावून संपूर्ण पीक जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
संपूर्ण हंगामभर रक्ताचे पाणी करून पिकवलेली तूर एकत्र करून मशीनद्वारे मळणी करण्याची तयारी सुरू होती, मात्र त्याच्या अवघ्या एक दिवस आधीच ही घटना घडली. आगीच्या लोटात शेतकऱ्याचे महिन्यांचे कष्ट, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह जळून खाक झाला आहे. पहाटे शेतात गेल्यानंतर संपूर्ण शिवार काळ्या राखेत बदललेले पाहून काकासाहेब तांगडे अक्षरशः कोलमडून पडले होते. शेतकऱ्याच्या डोळ्यांसमोर त्याचे स्वप्न, भविष्य आणि संसार उध्वस्त झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीती, संताप आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची तक्रार पाचोड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्याच्या पिकाला आग लावण्यासारखा गुन्हा करणाऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
सतत निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देणारा शेतकरी आता अशा समाजविघातक कृत्यांचा बळी ठरत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दावरवाडी शिवारातील शेतकरी काकासाहेब रामराव तांगडे यांच्या तुरीच्या पिकाला अज्ञात व्यक्तींनी आग लावून जाळून टाकल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे.
अशा समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी व दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, तसेच शासनाने सदरील शेतकऱ्याला तातडीने पंचनामा करून योग्य व भरघोस नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांनी केली आहे.















