जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा

Foto
 बुधवारी (दि. १८) रात्री शहरात गारांसह पाऊस झाला. पावसाला प्रारंभ होताच जवाहर कॉलनी परिसरातील बालाजीनगर, शिवशंकर कॉलनी आदी भागांत वीज गुल झाली. त्यामुळे अनेक वसाहती अंधारात बुडाल्या. भावसिंगपुर्‍यात झाड कोसळले तर शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
हवामान खात्याने मराठवाड्यात गारपीट आणि पावसाचा दिलेला इशारा खरा ठरला. शहरात रात्री नऊच्या सुमाराला विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवाता झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे भागांत पाणी साचले होते. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. शहराच्या अनेक भागांत दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी पावसाचा वेग इतका प्रचंड होता की जुनाट झाडे उन्मळून पडली. भावसिंगपुरा पसिरातील झाडे कोसळल्याने आणि तांत्रिक बिघाडामुळे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा तासनतास खंडित झाला होता, नागरिकांना अंधारात राहावे लागले.
रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहू लागल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आणि झाडे पडल्याने वाहतुकीचीही कोंडी झाली होती. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठी गर्दी होती. मात्र, या पावसाने व्यापार्‍यांच्या चिंतेत भर घातली आहे. दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापार्‍यांची धावपळ उडाली. कपडे, फळे, सुका मेवा आणि सजावटीच्या वस्तूंचे स्टॉल लावणार्‍या छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन सणामुदीच्या काळात आलेल्या या संकटामुळे विक्रेते हवालदिल झाले. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची आणि महावितरण यंत्रणेची धावपळ झाली. अनेक ठिकाणी फायरचे कॉल आले होते. विजेचा लपंडाव रात्रभर सुरू होता.