केळी, उसासह घरांचे प्रचंड नुकसान, झाडे उन्मळून पडली
पैठण, (प्रतिनिधी): रोजी दावरवाडी, दादेगाव परिसरात ६ जून रोजी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्याने मोठे नुकसान झाले. काही वेळ सुरू असलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील दावरवाडी, दादेगाव परिसरातील शेतकऱ्यां च्या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. तसेच अनेक घरांवरील टिनपत्रे व छपरांचे नुकसान झाले असून काही घरांतील वस्तूंचेही नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
या दरम्यान, शेतकरी वर्गालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. विशेषतः ऊस पिकावर जोरदार वाऱ्याचा परिणाम होऊन अनेक ठिकाणी ऊस मोडला व आडवा पडला आहे तसेच केळीच्या बागाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तत्काळ पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.













