अवकाळीचा केसर आंब्याच्या बागांना फटका

Foto


छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वार्‍यांमुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील केसर आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले असून, उत्पादक शेतकरी चिंताक्रांत आहेत. गारपीट, वादळी वार्‍यांमुळे मोठी फळगळ झाल्यामुळे उत्पादनात सरासरी तब्बल ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आंबा उत्पादकांसह फळबागतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कमी उत्पादनामुळे यंदा बाहेरच्या देशात केसर आंबा निर्यात होण्याची शक्यता धुसर असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
मराठवाड्यात केसरसह हापूस, लंगडा, तोतापुरी, निलम, दशेरी, राजापुरी, हायब्रिडमध्ये रत्ना, आम्रपाली, मल्लिका आदी आंब्यांचे उत्पादन घेतले जाते. फळबागतज्ज्ञांकडून प्राप्त माहितीनुसार यंदा दीर्घकाळ सुरू राहिलेल्या पावसामुळे आंब्याची फलोत्पादनाची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. त्यातच आता आंबा पिकाचा मोहोर ते फळधारणा हा महत्त्वाचा टप्पा सुरू असताना अवकाळी पावसामुळे फुलांचे नुकसान झाले आहे. जोरदार वार्‍यामुळे लहान फळे झाडांवर टिकू शकली नाहीत.
अवकाळीमुळे गुणवत्तेवरही परिणाम
याबाबत माहिती देताना आंबातज्ज्ञ डॉ. भगवान कापसे म्हणाले, यंदाच्या हंगामात २०२५ मध्ये मे महिन्यातच पावसाळा सुरू झाला. त्यामुळे गत हंगामात काही भागांत आंबा उशिराने उतरवला गेला. त्यामुळे पुढील हंगामाची मशागत, झाडांना पालवी फुटण्याची प्रक्रियादेखील उशिराने सुरू झाली. पुढे थंडीही १५ दिवस उशीरा सुरू झाली आणि ती कायम राहिली. त्यामुळे आंब्याचा मोहोर व पोलन प्रक्रियेला पोषक वातावरण मिळाले नाही.