औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडी, शिवसेना-भाजप महायुती, वंचित बहुजन आघाडीसह तब्बल 30 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस असून, दुपारी १२ वाजेपर्यंत तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. दुपार तीननंतर किती उमेदवार रिंगणात राहतील याचे चित्र स्पष्ट होईल. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आ.अब्दुल सत्तार हे आपला अर्ज परत घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्याचे मतदान येत्या २३ एप्रिल रोजी होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना या दोन मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण ४२ उमेदवारांनी ६२अर्ज दाखल केले होते. ४ एप्रिल रोजी झालेल्या छाननीत १२ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे ३० उमेदवार आता रिंगणात उरले आहेत. शिवसेना-भाजप युतीचे चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे आमदार सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे आमदार इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सुभाष पाटील यांच्यासह छोटे पक्ष आणि अपक्षांसह ३० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. अजूनही काही अपक्ष उमेदवार माघार घेण्याच्या तयारीत आहेत. अनेक जण अधिकृत उमेदवारासोबत चर्चा करीत असल्याचे समजते. उमेदवारांसोबत सेटिंग झाल्यावरच अपक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात येणार, असेही बोलले जाते. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तोपर्यंत सेटिंगचा खेळ चालणार, असे दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण २६ उमेदवार रिंगणात होते. यावेळी किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील, याचे उत्तर आज दुपारी ३ नंतर मिळेल.