जामिनावर सुटताच आरोपीने घडवला भीषण रक्तपात, पत्नी, दोन मुले आणि पीडितेसह ६ जणांची केली हत्या

Foto
हैद्राबाद :  जामीनावर सुटून आलेल्या आरोपीने स्वत:ची पत्नी, दोन मुलगे यांच्यासह एक अल्पवयीन बलात्कारपीडिता तिची आई आणि आजी अशा सहा जणांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना तेलंगाणामधील रंगारेड्डी येथे आज  सकाळी घडली. आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला  गुन्हा हे या हत्याकांडामागचे कारण असल्याचे सांगण्यात येत  आहे. मात्र या प्रकरणी पोलीस अधिक  तपास करत आहेत.

तेलंगाणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यामधील दैवलागुडा गावात ही भयंकर घटना  घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वत:च्या पत्नी आणि दोन मुलांसह एकूण सहा जणांची हत्या करणार्‍या आरोपीचं नाव राज कुमार असं आहे. आरोपी  राज  कुमार यांने आधी त्याची पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच्याविरोधात पॉक्सो  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणार्‍या अल्पवयीन मुलीचा जीव  घेतला. हा नराधम आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या मुलीची आई आणि आजी यांचीही हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला.

आरोपी राज कुमार याने ज्या सहा जाणांची हत्या केली आहे त्यामध्ये चिट्याला रुक्कम्मा (६५), चिट्याला लक्ष्मी (४५),  एक  अल्पवयीन मुलगी (१७) यांच्यासह राज कुमारयाची पत्नी सरिता (३०) आणि दोन मुलगे परीक्षित  (३) आणि दैविकक्षित (२) यांचा समावेश आहे. दरम्यान, आरोपीला आधी पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्या प्रकरणी अटक करण्यात  आली होती. तसेच नंतर त्याची जामीनावर मुक्तता झाली होती. मात्र जामीन मिळून बाहेर आल्यानंतर आरोपीने हे भीषण हत्याकांड घडवले. आता आरोपीने केलेल्या या कृत्यामागे केवळ त्याच्यावर दाखल केलेला गुन्हा हे  कारण होते की आणखी काही कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. 
जीवे मारण्याची धमकी आधीच दिली होती

मुलीचे काका, नरेश म्हणाले, ङ्गङ्घत्याने माझ्या आत्या आणि भाचीला मारले. त्याने यापूर्वी मुलीचा छळ केला होता आणि त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने एका आठवड्यात किंवा दोन आठवड्यांत संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याला चौकशीसाठी किंवा रिमांडसाठी नेण्यात आले नाही. त्याच्या कुटुंबीयांना तो कुठे आहे हे माहीत होते, पण पोलिसांना याची कल्पना नव्हती आणि प्रकरण दाबून टाकण्यात आले. घटनेच्या वीस दिवसांनंतर, आम्ही त्यांना पुन्हा कळवले की तो फिरत आहे आणि मुलीला ठार मारण्याची धमकी देत आहे. ते म्हणाले की ते त्याचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याची जामिनावर सुटका झाली. त्याने लाच दिली आणि प्रकरण दाबण्यात आले. आता त्याने मुलीची हत्या केली आहे आणि हे सर्व पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घडले आहे. त्यांना निलंबित केले पाहिजे आणि आरोपीला आमच्या ताब्यात दिले पाहिजे.

पॉक्सो कायदा काय आहे?
पॉक्सो हा अल्पवयीन मुलांवरील लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी आणि कठोर कायदेशीर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी २०१२ मध्ये लागू केलेला एक विशेष कायदा आहे.  
१८ वर्षांखालील प्रत्येक व्यक्तीला बालक मानले जाते.
खटल्यांची सुनावणी करण्यासाठी विशेष पॉक्सो न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत.
बालपीडिताची ओळख उघड करणे हा एक फौजदारी गुन्हा आहे.
गंभीर प्रकरणांमध्ये, जन्मठेपेपासून ते मृत्युदंडापर्यंतच्या शिक्षा आहेत (२०१९ च्या सुधारणेनंतर).