नवी दिल्ली : संसद परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात आजही आंदोलन केले. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी आणि इतर विरोधी खासदारांनी अमित शाह जवाब दो असे लिहिलेले फलक हातात घेतले होते आणि शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत गृहमंत्री संसदेत निवेदन देत नाहीत, तोपर्यंत हा तिढा कायम राहील, असे विरोधकांचे म्हणणे आहे. सभागृहाच्या आतही विरोधी पक्षांचा गदारोळ सुरूच होता. परिणामी, सकाळी ११ वाजता सुरू झालेले लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज केवळ अर्धा तास चालले. आज लोकसभेत सरकार चार विधेयके सादर करण्याची शक्यता आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी लोकसभेत आज (१० ऑगस्ट) चार विधेयके सादर केली जातील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन विधेयके सादर करतील. एक म्हणजे केरळ (नाव बदल) विधेयक, २०२६ आणि दुसरे म्हणजे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कायदा, १९६२ सुधारणा विधेयक. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, २०२६ सादर करतील. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी खाण आणि खनिज (विकास आणि नियमन) कायदा, १९५७ मध्ये सुधारणा करणारे विधेयक सादर करतील. राज्यसभेत बँकर्स बुक्स अँड एव्हिडन्स बिल, २०२६ वर चर्चा होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे विधेयक सभागृहात सादर करतील.
दरम्यान, विद्यार्थ्यांना २० जुलै रोजी दिल्लीच्या रस्त्यांवर सोलून काढल्यापासून संसदेत फिरकले नसल्याने विरोधकांचा संताप झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून विरोधकांची चर्चेची मागणी करूनही अमित शाह यांनी संसदेत प्रवेश केलेला नाही. त्यामुळे आता आज अमित शाह संसदेत येण्याची शक्यता असल्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गर्भित इशारा दिला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत अमित शाह यांनाही टॅग केलं आहे.
तुम्हाला या गुन्ह्यासाठी उत्तर द्यावेच लागेल
राहुल गांधी यांनी टॅग करत म्हटलं आहे की, तेरा दिवस उलटून गेले, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून एक शब्दही आलेला नाही. माफी मागण्याऐवजी, मोदी क्षमादान वाटत आहेत. अमित शाह आम्ही जबाबदारीची मागणी करणे थांबवू, असे समजू नका. राजधानीच्या रस्त्यांवर मुलांना लाठीमार आणि पेलेट्सने मारहाण झाली आणि तुम्ही एक शब्दही बोलला नाहीत. आज नाही तर उद्या, तुम्हाला या गुन्ह्यासाठी उत्तर द्यावेच लागेल. विद्यार्थी हे राष्ट्राचा प्रकाश आहेत, आणि मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही असे मला प्रयागराजमध्ये एका विद्यार्थ्याने सांगितले. वर्षानुवर्षे तयारी, घर विकणे, आई-वडिलांचे कर्ज फेडणे, आणि तरीही हातात काहीच नाही. हा त्याचा पराभव नाही. हा त्या व्यवस्थेचा पराभव आहे, जिने त्याच्या कष्टांना दाद देण्यास नकार दिला. तेरा दिवस उलटून गेले गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून एक शब्दही आलेला नाही. माफी मागण्याऐवजी, मोदी क्षमादान वाटत आहेत. अमित शाह आम्ही जबाबदारीची मागणी करणे थांबवू, असे समजू नका. राजधानीच्या रस्त्यांवर मुलांना लाठीमार आणि पेलेट्सने मारहाण झाली आणि तुम्ही एक शब्दही बोलला नाहीत. आज नाही तर उद्या, तुम्हाला या गुन्ह्यासाठी उत्तर द्यावेच लागेल.विद्यार्थी हे राष्ट्राचा प्रकाश आहेत, आणि मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे.
दुसरीकडे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, काँग्रेस एफसीआरए दुरुस्ती विधेयकाला विरोध करेल. आज विरोधी पक्षांच्या सभागृह नेत्यांच्या बैठकीतही या विषयावर चर्चा होणार आहे. एफसीआरए दुरुस्ती विधेयक पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. परदेशी देणग्यांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हा याचा उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकाला आधीच विरोध केला आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी अमित शाह यांची भेट घेऊन एफसीआरए शी संबंधित सहा मुद्दे उपस्थित केले. लालदुहोमा म्हणाले की, हे बदल पूर्वलक्षी प्रभावाने लागू केले जाणार नाहीत, असे आश्वासन त्यांना मिळाले आहे. उर्वरित मुद्द्यांवर १२ ऑगस्टपासून संसदेत चर्चा होईल. दरम्यान, डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी हे विधेयक मागे घेण्याची आणि एफसीआरएचे कलम १५ रद्द करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) ने देखील या विधेयकाला विरोध केला आहे.