वैजापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनाचा विसर वैजापूर येथील तहसीलदार आणि तहसील कार्यालयाला पडल्याची
घटना समोर आली आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ
आणि एआयएमआयएमने केली आहे.
काय आहे प्रकरण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गुरुवारी (ता. ६) ६३वा महापरिनिर्वाण दिन होता.
राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांपासून गाव-खेड्यातील ग्रामपंचायतींपर्यंत संपूर्ण देशात
डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. मात्र वैजापूर येथील तहसीलदार विनोद
गुंडमवार यांना महापरिनिर्वाण दिनाचा विसर पडला, की जाणून बुजून त्यांनी
महामानवाला अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी शासकीय प्रोटोकॉल नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांना
उडवाउडवीची उत्तरे देऊन अभिवादन कार्यक्रम घेण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.
कार्यकर्त्यांनी स्वतः अभिवादन करण्याचे ठरविले तेव्हा तहसील कार्यालयात
महापुरुषांची प्रतिमाच नसल्याचे समोर आले.
वैजापूर तहसील
कार्यालयाला डॉ. आंबेडकरांचा विसर
संपूर्ण देशात
आणि महाराष्ट्रात ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
केले जात असताना वैजापूर तहसील कार्यालयाला या दिवसाचाच विसर पडला होता. तहसील
कार्यालयात महापुरुषांचा फोटोही उपलब्ध नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. या
घटनेची माहिती झाल्यानंतर गुरुवारी दुपारी भारिप बहुजन महासंघ आणि एआयएमआयएमचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात
आले आणि त्यांनी तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्याकडे विचारणा केली. यावेळी
तहसीलदार गुंडमवार यांनी कार्यकर्त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खरे म्हणजे आज
महापरिनिर्वाण दिन असतो हेच तहसीलदारांना माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी
तातडीने डॉ. आंबेडकरांना अभिवादनाचा कार्यक्रम घेण्याची मागणी केली. त्यावर
गुंडमवार यांनी तसा शासकीय प्रोटोकॉल आहे का, हे पाहावे लागेल, सांगत टाळाटाळ
करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी स्वतः तहसील
कार्यालयात महामानवाला अभिवादनाचा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले, तेव्हा
कार्यालयात डॉ. आंबेडकरांची प्रतिमाच नसल्याचे समोर आले.
वैजापूरमध्ये
शासकीय कार्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन न करण्याची घटना प्रथमच घडत असल्याचे
भारिपचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब वाघ आणि एआयएमआयएमचे जाकीर भाई यांनी सांगितले.
प्रशासकीय अधिकाऱ्याकडून एवढी अक्षम्य चूक होतेच कशी, असा सवाल कार्यकर्त्यांनी
उपस्थित केला. यानंतर भारिप आणि एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी स्वतः डॉ.
बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणून तहसील कार्यालयाला
भेट दिली आणि अभिवादानाचा कार्यक्रम घेतला. यावेळी भारिप तालुकाध्यक्ष वाल्मिक पठारे, विकास जाधव, सौरभ साळवे, संतोष गायकवाड, गणेश पगारे, बाबासाहेब
शिनगारे, प्रकाश वाघ, बुद्धभूषण
साळवे, धनगर संघर्ष
समितीचे तालुका अध्यक्ष संतोष तागड, भीमराज वाघ, विजय वाघ, दत्तात्रय काकडे
पाटील तसेच एआयएमआयएमचे अकील कुरेशी, जाकीर कुरेशी
यांची उपस्थिती होती.












