वर्धमान जैन यांनी तिरुपती बालाजीला दान केले १२१ कोटींचे सोने !!

Foto
चेन्नई : तिरुपती बालाजी दक्षिण भारतातील सर्वात मोठं श्रद्धा स्थान मानलं जातं. आजही भारताच्या वेगवेगळ्या भागातून भाविक तिरुपतीच्या दर्शनाला पायी चालत जातात. तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या चरणी एका भाविकाने तब्बल १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. या दागिन्यांची अंदाजे किंमत १६० ते २०६ कोटी रुपये आहे. या दागिन्यांची सगळीकडे चर्चा होत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत आज तिरुमला तिरुपती देवस्थानमकडे हे दागिने औपचारिकरीत्या सुपूर्द केले आहेत.

नऊ संच आणि ४५ पारंपरिक दागिने
या महादानामध्ये नऊ संचांमध्ये विभागलेले तब्बल ४५ सोन्याचे दागिने आहेत. मुख्य मूर्ती तसेच उत्सवमूर्तींच्या अलंकारासाठी हे दागिने तयार करून घेण्यात आले आहेत. यामध्ये श्रीवारींचा मुकुट (किरीटम), कमरपट्टा (वड्डणम), खांद्यावरील दागिने (भुजकीर्ती), शंख-चक्र, अभय हस्त आणि पदम पादलू (पायात विशिष्ट प्रकारची साखळी असते) यांसारख्या पारंपरिक अलंकारांचा समावेश आहे. शास्त्रातील नियम आणि देवस्थानच्या धार्मिक पद्धतींनुसार हे दागिने तयार करण्यात आले आहेत.

चेन्नईतून कडेकोट बंदोबस्तात मंदिरात आणलं सोनं
चेन्नईतील जीआरटी ज्वेलर्स यांनी हे खास दागिने तयार केले आहेत. कडेकोट सुरक्षेत ते तिरुमला इथे आणण्यात आले असून, रंगनायकुला मंडपम येथे लाकडी रॅकवर भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्याची व्यवस्था देवस्थान प्रशासनाने केली आहे. भारताच्या इतिहासात कोणत्याही मंदिरासाठी एखाद्या व्यक्तीने दिलेले हे सर्वांत मोठे दान मानले जात आहे. सुमारे २.२६ लाख कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या तिरुमला देवस्थानच्या वैभवात या भक्तीभावाने आणखी मोठी भर पडली आहे.

तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या चरणी तब्बल १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण करणाऱ्या त्या अज्ञात भक्ताचे नाव अखेर समोर आले आहे. ॲक्सेस हेल्थकेअर’ (Access Healthcare) आणि आशिया चेन्नई इंजिनिअरिंगचे संस्थापक वर्धमान जैन यांनीच हे महादान केल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. देवस्थानकडे दागिने सुपूर्द करताना आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती त्यांनी केली होती, मात्र आता या दात्याची ओळख उघड झाली आहे.

कोण आहेत वर्धमान जैन?
वर्धमान जैन हे एक यशस्वी उद्योजक असून त्यांचा व्यवसाय आणि समाजकार्याचा मोठा आवाका आहे. २०२५ मध्ये त्यांनी आपल्या ‘ॲक्सेस हेल्थकेअर’ कंपनीतील ७० टक्के हिस्सा एका अमेरिकन कंपनीला विकला होता. हा व्यवहार सुमारे २ अब्ज डॉलर्सचा (अब्जावधी रुपयांचा) असल्याचे सांगितले जाते.
वर्धमान जैन यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमला  यापूर्वीही अनेकदा मोठी मदत केली आहे. मे २०२६ मध्ये त्यांनी देवस्थानला इलेक्ट्रिक बसेस भेट दिल्या होत्या. तसेच ‘श्री व्यंकटेश्वर भक्ती चॅनेल’च्या विकासासाठी ७ कोटी रुपयांची देणगी आणि देवस्थानच्या हुंडीतील नाणी मोजण्यासाठी १ कोटी रुपये किमतीचे आधुनिक ‘कॉइन-सॉर्टिंग मशिन’ही त्यांनी दिले आहे.

व्यवसायासोबतच समाजकार्यातही मोठा वाटा
केवळ मंदिरांना देणग्या देणेच नव्हे, तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही त्यांचे भरीव काम सुरू आहे. वंचित घटकांतील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना कौशल्य विकासाच्या संधी मिळाव्यात, यासाठी त्यांनी आविष्कार नावाची संस्था सुरू केली आहे. ते चेन्नईतील ‘कांची कामकोटी चाइल्ड्स ट्रस्ट हॉस्पिटल’चे व्यवस्थापकीय विश्वस्त (मॅनेजिंग ट्रस्टी) म्हणून काम पाहतात. याशिवाय, सरिता जैन फाउंडेशनच्या माध्यमातून विद्या सेवा आणि वैद्य सेवा या उपक्रमांद्वारे ते गरजूंना शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत पुरवतात