विविध कंपन्यांना आता पाईपद्वारे मिळणार गॅस

Foto
त्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : गेल्या काही दिवसांपासून गॅस टंचाईमुळे उत्पादनावर परिणाम झालेल्या औद्योगिक क्षेत्राला आता मोठा दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. वाळूज औद्योगिक परिसरासह विविध कंपन्यांना ’पीएनजी’ (पाईप्ड नॅचरल गॅस) जोडणी सुरू करण्यात आली असून, टप्प्याटप्याने गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. सोमवारी संध्याकाळनंतर या कामाला सुरुवात झाली असून मंगळवारी या कामाने वेग घेतल्याचे कंपनी व भारत पेट्रोलियमच्या वतीने (बीपीसीएल) सांगण्यात आले.
वाळूजमधील १० प्रमुख कंपन्यांमध्ये गॅस जोडणीचे काम सुरू झाले आहे. या कंपन्यांना येत्या आठवड्यात प्रत्यक्ष गॅस वितरण सुरू होणार असून, त्यामुळे उत्पादन प्रक्रियेला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय आणखी १५ कंपन्यांसोबत गॅस पुरवठ्याचे करार पूर्ण झाले असून, त्या ठिकाणीही लवकरच जोडणी करून पुरवठा सुरू केला जाणार आहे. तसेच २५ उद्योजकांनी पीएनजी सुविधेबाबत सविस्तर विचारपूस केली असून, लवकरच या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांत गॅस सिलिंडरच्या अनियमित पुरवठ्यामुळे अनेक उद्योगांना फटका बसला होता. उत्पादन वेळापत्रक कोलमडणे, कामगारांना अर्धवेळ काम द्यावे लागणे, तसेच काही ठिकाणी उत्पादन थांबवण्याची वेळ येणे, अशा अडचणी उद्भवल्या होत्या. विशेषतः लघु व मध्यम उद्योगांना या परिस्थितीचा अधिक फटका बसल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत पीएनजी हा पर्याय उद्योगांसाठी अधिक सुरक्षित, अखंडित आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.