भाजप नगरसेवकांचा रास्ता रोको सिग्मा हॉस्पिटल रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांना हटविले

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेत बहुमताने सत्ता स्थापन केलेल्या भाजपच्या नगरसेवक नगरसेविकांच्या नातेवाइकांना शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सोमवारी (दि. ६) रास्ता रोको करावा लागला. या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलीस व मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने वरद हॉस्पिटल ते सिग्मा हॉस्पिटल दरम्यान रस्त्यावरील भाजीपाला, फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले. या आंदोलनामुळे सोमवारी दिवसभर रस्ता मोकळा होता. विक्रेत्यांची सोय शहानूरमियां दर्गा परिसरातील मनपाच्या गाळ्यांमध्ये करावी, रस्ता कायम मोकळा राहील. अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. वरद हॉस्पिटल ते सिग्मा हॉस्पिटल दरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूंनी भाजीपाला, फळ विक्रेते आपली दुकाने थाटतात. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना, तसेच परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. विक्रेत्यांच्या गाड्या तसेच खरेदीसाठी थांबलेल्या नागरिकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वारंवार कारवाई केल्यानंतरही याठिकाणी दुतर्फा रस्त्यावर हातगाड्या, वाहने उभी करून १ व्यवसाय केला जातो. काही जणांनी तर पाल ठोकून जागेचा अनधिकृत ताबा घेतला आहे. ही अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपच्या नगरसेविका शोभा बुरांडे, अर्चना नीळकंठ यांच्यासह नागरिकांनी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. विक्रेत्यांचे दुतर्फा अतिक्रमण भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नगरसेविका शोभा बुरांडे, अर्चना नीळकंठ यांच्यासह काही नागरिक अतिक्रमणधारकांना समजावण्यासाठी गेल्या असता भाजीपाला विक्रेत्यांनी त्यांना अरेरावी केली. दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकली होती. अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे हे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याची मागणी सातत्याने होत होती त्यामुळे आम्ही रास्ता रोको आदोलन केले, अशी माहिती शैलेंद्र नीळकंठ यांनी दिली.