बसमध्येच होणार बनावट दिव्यांगांची पडताळणी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : एसटी महामंडळाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे वापरून प्रवास करणार्‍यांना रोखण्यासाठी बनावट वैश्विक अपंग ओळखपत्र (यूडीआयडी) एसटीत वापरून सवलतीचा लाभ घेणार्‍या प्रवाशांची पडताळणी मोहीम सुरु केली आहे. एसटीतील सर्व वाहक, पर्यवेक्षक आणि तपासणी कर्मचार्‍यांच्या मोबाइलमध्ये यूडीआयडी अ‍ॅप डाऊनलोड करून प्रत्येक दिव्यांग प्रवाशाची पडताळणी केली जाणार आहे. प्रसंगी थेट गुन्हा दाखल करून बनावट ओळखपत्र जप्तही केले जाणार आहे.
अलीकडच्या काळात बनावट यूडीआयडी कार्डाचा वापर करून सवलतीत प्रवास करणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. अनेकजण रंगात बदल करून किंवा फोटो बदलून बोगस कार्ड तयार करतात. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) दिव्यांग प्रवाशांना तिकिटाच्या दरात ७५ टक्के ते १०० टक्केपर्यंत सवलत देते. गंभीर अपंगत्त्व असलेल्या व्यक्तीसोबतएका सहायकालाही ५० टक्के सवलत मिळते. ही सवलत मिळविण्यासाठी युनिक डिसेबिलिटी आयडी कार्ड असणे अनिवार्य आहे.
तर बोगस कार्ड होईल जप्त
एखाद्या प्रवाशाचे ओळखपत्र बनावट आढळले तर ते जप्त केले जाईल. अशा प्रवाशावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर संबंधित प्रवाशाची सर्व माहिती म्हणजेच नाव, अपंगत्वाचा प्रकार, वैधता ऑनलाइन दिसणार आहे. 
त्यामुळे दिव्यांग प्रवाशांची ओळख पटणार आहे. भरारी पथके किंवा तपासणी अधिकारी धावत्या बसमध्ये केव्हाही चढून प्रवाशांच्या कार्डची पडताळणी करतील.