ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन; एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त

Foto
मुंबई : ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं आज (शुक्रवार) सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनाने ठाणे शहरासह साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ. आनंद नाडकर्णी हे ठाण्यातील समता नगर भागात राहत होते. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या आठवड्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्या आरोग्यासंदर्भात काही गुंतागुंत निर्माण झाली होती. शस्त्रक्रियेनंतर ते बरे झाले होते. परंतु गुरुवारी रात्रीपासून त्यांची तब्येत खालावली होती. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी १९८० साली एम.बी.बी.एस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदव्या मिळवल्या होत्या. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींन विरुद्ध चळवळ उभारण्यासाठी त्यांनी २३ मार्च १९९० रोजी ठाणे शहरात आयपीएस अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी मोठं कार्य केलं. लेखक व्याख्याते आणि समुपदेशक म्हणूनही त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित नाडकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

एकनाथ शिंदे यांची पोस्ट
ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय धक्का देणारं आहे. असिम उर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असलेले डॉ. नाडकर्णी हे ठाण्याचे लाडके सुपूत्र. गेली साडेतीन दशकं मनोविकारशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी निरलसपणे काम केलं. सुदृढ मन सर्वांसाठीफ हे ब्रीद घेऊन त्यांनी इन्सिट्यूट फॉर सायकॉलॉजी या संस्थेची स्थापना केली. हजारो अस्थिर मनांना सावरून त्यांच्या कुटुंबियांचं ते खर्‍या मित्र बनले. त्याचवेळी, कै. डॉ. सुनंदा अवचट यांच्या साथीने त्यांनी पुण्यात मुक्तांगणफ या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. या दोन्ही संस्थांनी समाजाची केलेली सेवा ही कोणत्याही स्वयंसेवी संस्थेनं कशाप्रकारे काम करावं याचंच एक आदर्श प्रमाण आहे, असं त्यांनी लिहिलं.

मनोविकारशास्त्राच्या क्षेत्रात व्यग्र असताना त्यांच्यात महाविद्यालयीन काळापासून कार्यरत असलेला लेखक, नाटककारही तेवढाच सक्रिय राहिला. गद्दे पंचविशी, वैद्यक सत्ताफ यासह शहाण्यांचा सायकिएट्रीस्ट, मनमैत्रीच्या प्रदेशात अशी सुमारे २७ प्रकाशित पुस्तकं वाचकप्रिय आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहेत. नाट्य क्षेत्रात जन्मरहस्य, त्या तिघांची गोष्ट, रंग माझा वेगळाफ ही नाटकंही रसिकप्रिय झाली. डॉ. नाडकर्णी यांच्या निधनामुळे उत्तम मनोविकारतज्ज्ञ, ललित लेखक, कवी, नाटककार, अभिनेता, संगीतकार, तबलावादक, चित्रकार, सामाजिक कार्यकर्ते, तत्वज्ञानाचे कृतीशील अभ्यासक असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,फ अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखे कार्य करणार्‍या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.