मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. भाटकर हे कर्करोगाने ग्रस्त होते.
कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी रमेश भाटकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय दामिनी, बंदिनी, युगंधरा या त्यांच्या मालिकेतील भूमिकांनी ते रसिक प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिले. भाटकर हे माझे पती सौभाग्यवती या मालिकेतही झळकले होते. अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमामंधून त्यांच्या विविध भूमिका गाजल्या. रमेश भाटकर हे गायक आणि संगीतकार वासूदेव भाटकर यांचे पूत्र. ३ ऑगस्ट १९४९ रोजी त्यांचा जन्म झाला होता. अश्रूंची झाली फूले हे त्यांचे सर्वाधिक गाजलेले नाटक होते.
१९७७ मध्ये रमेश भाटकर यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ३० पेक्षा अधिक वर्ष त्यांनी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. वयाच्या पासष्टीनंतरही त्यांच्यात तोच उत्साह होता. 'तू तिथे मी' आणि 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेत त्यांनी अभिनयाने अनेकांची मनं जिंकली होती. दि ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.