स्थानिक गुन्हे शाखेसह वडोदबाजार पोलिसांकडून शोधमोहीम
फुलंब्री, (प्रतिनिधी) तालुक्यातील पाची येथील इम्रान सव्यद पाथ्रीकर हा तरुणाचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती हवेत गोळीबार करताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये पाश्री येथील इम्रान सय्यद हा व्यक्ती बंदूक घेऊन हवेत गोळीबार करताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच वडोद बाजार पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तपास सुरू केला.
पोलिसांकडून व्हिडिओची सत्यता तपासण्याबरोबरच त्यातील व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले. प्राथमिक तपासात व्हिडिओमधील व्यक्ती पाथ्री येथील इम्रान सय्यद असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र सदरील इम्रान सय्यद सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या संभाव्य ठिकाणांचा शोध घेतला जात असून लवकरच त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.













