पोलिस निरीक्षकांचा १४ लाखांची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ऐतिहासिक बुद्धलेणी परिसरात ब्लास्टिंग केल्याने लेणीला तडे जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या अवैध ब्लास्टिंग व उत्खनन प्रकरणी जून २०२५ मध्ये बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी न होता कारवाई टाळण्यासाठी बेगमपुरा पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांच्यासाठी १४ लाखांची लाच घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणाची दखल घेऊन जगताप यांची मुख्यालयात बदली केली असून गायकवाड यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली.
बुद्ध लेणीला ब्लास्टिंगचे हादरे बसतात. त्यामुळे क्रमांक सातच्या लेणीला धोका निर्माण होतो. या लेणीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.
 त्या ठिकाणी ८ ते १० जेसीबी आणि पोकलेन सुरू होते. पोकलेनचेदेखील जोरदार धक्के लेणीपर्यंत जात असल्याने ऐतिहासिक वारशाला धोका निर्माण झाला होता. या प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात कारवाई न व्हावी यासाठी १४ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा दावा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कारमध्ये बसून रोख रक्कम मोजली जात असल्याचे दिसते.