मुंबई : अमरावतीतील परतवाडा प्रकरणावरून भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या जातीयवादी वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जहरी टीका केली आहे. नवनीत राणा म्हणजे जातीय विष पसरवण्यासाठी पोसलेली विषवल्ली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एकेरी भाषेतल्या टीकेला नवनीत राणा यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. हे चिल्लर लोक आहेत. काँग्रेसने हिरवे विषारी साप जोपासले आहेत, असे म्हणत नवनीत राणा यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधलाय.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली आहे. जात आणि धर्मात भांडण लावून सत्तेची पोळी कशी शेकता येईल? यासाठी पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली आहे. महिलांवरील अत्याचारासंदर्भात जात आणि धर्म कुठे येतो? असे कृत्य करणारा नालायक असतो त्याला फाशी झालीच पाहिजे. तिथे बुरखावाले नव्हते, असं नवनीत राणा कोणत्या आधारावर बोलली? तोंडात आलं की काहीपण वाफा काढायचं का? या बाईची जीभ जातीयवादी आणि धर्मांध बनली आहे. लोकांनी निवडणुकीत पाडून जिरवलं तरी अजून शुद्धीवर यायला तयार नाही.
नवनीत राणांना अटक करा : विजय वडेट्टीवार
त्यांना हनुमान चालीसाच्या दोन ओळी बोलता येत नाही. ते हिंदू धर्माच्या गोष्टी बोलत आहेत. खरात प्रकरणावर ब्र न काढणारी बाई. मुस्लीम तरुण दिसल्याबरोबर बावचळल्यासारखी बोलते हे अत्यंत घृणास्पद आहे. त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे. नवनीत राणा यांनी धर्मांध पसरविण्याचा आणि दोन धर्मात तेढ पसरविण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक व्हायला पाहिजे, अशी टीका त्यांनी नवनीत राणा यांच्यावर केलीय.
नवनीत राणांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार
दरम्यान, नवनीत राणा यांनी देखील विजय वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केलाय. हे सगळे चिल्लर लोक आहेत. त्यांच्यावर बोलण्याची मला गरज नाही. काँग्रेसने हिरवे विषारी साप पाळून ठेवले आहेत. म्हणून ते वळवळ करत आहेत. हे सगळे प्रकार आता बाहेर येत आहेत. काँग्रेसच्या काळात या हिरव्या सापांना जपण्याचं काम काँग्रेसने केलं आणि हे प्रकरण दाबण्याचे काम काँग्रेसने केलं. हिरव्या सापांना ठेचण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस करतील. काँग्रेसवाल्यांना माझं एवढं चांगलं आहे की, महिलांवर बोलण्याच्या आधी तुमच्या घरी पाहा. तुमच्या घरातही मुली आहेत. या चिल्लर माणसांनी नाशिकच्या TCS प्रकरणावर का बोललं नाही? असे म्हणत नवनीत राणा यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला.