फुलंब्री, (प्रतिनिधी) : आडगाव (बु) येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाण्यात बसून आंदोलन केले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, व्यापारी, नोकरीसाठी ये जा करणारे कर्मचारी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या समस्येबाबत संबंधित अभियंत्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी पाण्यात बसून निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान रस्त्यावरील पाणी तातडीने काढून कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था करावी, तसेच रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा भारत भूमे या ग्रामस्थांनी दिला.













