विशाल आढेेने पिस्टलमधून गोळी झाडल्याचे स्पष्ट

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ५० लाख रुपयांच्या वादातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विभागप्रमुख प्रा. राजाभाऊ सुभराव लोंढे यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. ३९ दिवसांनंतर वाचा फुटलेल्या लोंढे खून प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली. पहिल्या दिवशी लोंढे यांच्या पिस्टलातूनच गोळी घालून हत्या केल्याचे आरोपी सांगत होता, मात्र आरोपींनी खून करण्यासाठी गावठी कट्टा आणला आणि त्यातून गोळी झााडल्याचे तपासात समोर आले. 
पोलिसांनी गेवराई तांडा येथून हा गावठी कट्टा जप्त केला. दरम्यान या प्रकरणाला हनीट्रॅपची किनार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, तिसरा आरोपी करण विलास आढे (२२, रा. गिरनेर तांडा) याला न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
डोक्यात उजवीकडे अडकली गोळी
आरोपी विशाल राठोड याने गावठी कट्ट्यातून प्रा. लोंढे यांच्या डोक्यात गोळी घातली. डाव्या कानाकडून मारलेली गोळी त्यांच्या उजव्या बाजूला डोक्यातच अडकली होती. १५ मार्च रोजी तहसीलदाराच्या उपस्थितीत खड्डा उकरून काढलेल्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर घाटीत शवविच्छेदन केले. तेव्हा डोक्यातून गोळी बाहेर काढल्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी सांगितले.
’त्या’ महिलेचीही चौकशी
प्रा. लोंढे यांच्या खून प्रकरणात विशाल विकास राठोड (२४), आकाश विनोद पवार (३२. दोघे रा. गेवराई तांडा, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि करण विलास आडे (२२. रा. गिरनेर तांडा, छत्रपती संभाजीनगर) हे तीन आरोपी अटक आहेत. विशाल आणि आकाशला १७ मार्च रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाईल. दरम्यान, या प्रकरणात विशालच्या संपर्कात असलेल्या एका रिल स्टार महिलेचीही चौकशी केली जाणार आहे. तिचा यात काही संबंध आहे का, तिच्याशीही काही आर्थिक व्यवहार होते का, याचा पोलीस शोध घेत आहेत.