छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे हत्याकांडातील मुख्य आरोपी विशाल राठोड याने त्यांच्याकडून घेतलेल्या ६५ लाखांपैकी १२ लाख रुपये खर्च करून जग्वार कार (एमएच १२ एनयू ०३३३) खरेदी केली. सध्या ही कार कोकणवाडीतील एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेली आहे. याची कबुली खुद्द विशालनेच दिली. परंतु इतर रक्कम कुठे आहे, तिचे काय केले, तीदेखील कुठे खर्च केली का, हे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहेत.
एका रिअॅलिटी शोसाठी घेतलेल्या पैशांच्या वादातून लोंढे यांचा खून झाला होता. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी विशालसह अन्य तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. असे एकूण चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यातील आकाश पवार याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. उर्वरित पैकी विशाल, करण आडे आणि अक्षय शेटे हे पोलिस कोठडीत आहेत. त्यांची विचारपूस सुरू आहे.
मोबाइल गेमच्या धाग्यानंतर आता पोलिसांनी शस्त्राचा स्रोत, आर्थिक व्यवहार आणि आरोपींना मदत करणार्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पुण्यात लपवून ठेवलेला मोबाइल हस्तगत करण्यासाठी आरोपींना घेऊन एक पथक लवकरच पुण्याला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली.














