मुंबईकरांत मतदानाचा उत्साह; अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 जागांवर मतदान सुरू !

Foto

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील 71 जागांसाठी सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील हा अखेरचा टप्पा असून यात मुंबई, ठाण्यासह 17 मतदारसंघांतील 323 उमेदवारांचे राजकीय भवितव्य सुमारे तीन कोटी 11 लाख मतदार ठरवणार आहेत. आज सकाळपासून मुंबईकरांमध्ये मतदानाचा मोठा उत्साह दिसून आला.  अनेक ठिकाणी दिड कि.मी.पर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी 12.30 वाजेपर्यंत 30 टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले होते. मुंबई-ठाण्यावरील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पहिल्या तीन टप्प्यांतील मतदान शांततेत पार पडले असले तरी चौथ्या टप्प्यात अनेक मतदारसंघात होणार्‍या अटीतटीच्या लढती लक्षात घेऊन आयोगाने तब्बल 872 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. सोमवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. मुंबईत सकाळी उद्योगपती अनिल अंबानी, अभिनेता आमिर खान, अभिनेत्री माधुरी दीक्षित- नेने, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, काजोल, अजय देवगण,अनुपम खेर आदी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील 72 जागांवर आज मतदान होते आहे. 2014मध्ये या 72 पैकी 56 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. यावर्षी भाजप पुन्हा या जागा जिंकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज राजस्थान-उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 08, महाराष्ट्रातील 17, मध्य प्रदेश-ओडिशातील 06, बिहारमधील 05 आणि झारखंडमधील 3 जागांवर मतदान होतं आहे. 12 कोटीहून अधिक मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा आज अंतिम टप्पा आहे तर मध्य प्रदेश आणि राजस्थानातील पहिला टप्पा आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश ,राजस्थानातील ज्या जागांवर आज मतदान होत आहे त्या सर्वच जागा भाजपने 2014मध्ये जिंकल्या होत्या. पण 2018 विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेस सत्तेत आले होते. त्यामुळे यावेळी भाजपला या सगळ्या जागा राखता येतील की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.  एकेकाळी राष्ट्रवादीचा गड मानला जाणार्‍या पश्चिम महाराष्ट्रात 2014मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019मध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. 

अनेक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड 
नाशिक जिल्ह्यातील विहितगाव, शिरुर लोकसभा मतदारसंघातील कोंढवा खुर्द येथील मनपा शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 289 मधील मतदान यंत्रात बिघाड झाली होती. त्यामुळे येथे मतदान सुरु होण्यास उशीर झाला.  डोंबिवली येथील खिडकाळी,  ठाण्यातील मनपा शाळा क्र 89, पालघर लोकसभा मतदार संघातील कवाडा मतदान केंद्र,  मावळमधील काळेवाडी सह अनेक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. परंतु प्रशासनाने तात्काळ दुसरे मतदान यंत्र लावून मतदान सुरू केले. यावेळी मतदान सुरू होण्यास थोडा उशीर झाला हे मात्र नक्‍की.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker