जिल्हा परिषद, पंचायत समितीचे मतदान शांततेत सुरू

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. तालुक्यात जिल्हा परिषदेचे ९ गट व पंचायत समितीचे १८ गण असून सर्व मतदान केंद्रांवर सुरळीतपणे मतदान होत आहे.

मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कुठेही रांग किंवा गोंधळ पाहायला मिळाला नाही. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे ८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, प्रशासनाकडून पोलिंग चिटचे वाटप न झाल्यामुळे गंगापूर तालुक्यातील जामगाव जिल्हा परिषद गटात अनेक मतदारांना मतदार यादीत आपले नाव शोधताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे काही काळ मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

 निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी गंगापूर उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मतदान प्रक्रिया सायंकाळपर्यंत शांततेत पार पडेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

--- गंगापूर जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी सकाळी दोन तासांत ८.३१ टक्के मतदान ---
गंगापूर तालुक्यात आज शनिवारी (दि. ७) फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील एकूण ३४७ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

निवडणूक प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार सकाळी ७. ३० ते ९. ३० या दोन तासांच्या कालावधीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. तालुक्यातील एकूण मतदार संख्या २ लाख ९८ हजार ८९२ इतकी असून, त्यापैकी १ लाख ५५ हजार ७८० पुरुष मतदार तर १ लाख ४३ हजार ०९८ महिला मतदार आहेत. 

सकाळी ७. ३० ते ९.३० या वेळेत एकूण २४ हजार ८३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांचे प्रमाण ५.२४ टक्के, तर महिला मतदारांचे प्रमाण ३.०७ टक्के असून, एकूण मतदानाची टक्केवारी ८.३१ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी विजय राऊत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी दिली. 

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, निवडणूक प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दिवसभरात मतदानाचा टक्का वाढेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.