विधान परिषदेच्या १७ पैकी ११ जागांसाठी मतदान सुरु, कोण, कुठे रिंगणात? महायुतीचे ६ उमेदवार बिनविरोध

Foto
मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ पैकी ११ जागांसाठी आज गुरुवारी (दि. १८ जून) मतदान सुरु आहे. विधान परिषदेच्या एकूण १७ जागा आहेत. यातील ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा- गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव- लातूर-बीड, परभणी- हिंगोली, छत्रपती संभाजीनगर- जालना आदी ११ जागांसाठी आज मतदान होत आहे.

ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. तसेच यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड- रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे, पुणे येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे, वर्धा- गडचिरोली- चंद्रपूर येथून भाजपचे अरुण लखाणी, अहिल्यानगरमधून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

कोण, कुठे रिंगणात?
सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होत आहे. जळगावात भाजपचे नंदकिशोर महाजन, ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद तायडे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे रिंगणात आहेत. सांगली-सातारा येथून भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात सामना होत आहे.

विधान परिषद निवडणुकीत तिरंगी लढत
नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर विरुद्ध काँग्रेसचे रामदास पाटील, नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचे डॉ. राजीव पोतदार विरुद्ध काँग्रेसचे अतूल लोंढे, भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध काँग्रेसचे नरेश ईश्वरकर, अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षदीप देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा, धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघातून भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख, परभणी-हिंगोली येथे शिवसेनेचे सईद खान, ठाकरेंच्या शिवसेनेचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख यांच्यात लढत होत आहे. तर छत्रपती संभाजीनगर- जालना येथे भाजपचे सुहास शिरसाट विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे गणेश लोखंडे आमने-सामने आहेत.

या निवडणुकीसाठी सकाळी ८ ते दुपारी ४ अशी मतदानाची वेळ आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार आहे. याची मतमोजणी २२ जूनला सकाळी होईल.