औरंगाबाद: तीन दिवसापूर्वी लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्रावर एका तरुणाने मोबाईल घेऊन जाऊन मतदान केल्याचा व्हिडिओ तयार केला होता. तो व्हिडियो त्याने टिकटॉकवर व्हायरल केला होता. यामुळे येथील सायबर व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला आज अटक करण्यात आली आहे.
शेख इब्राहिम शेख करीम असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरील तरुणाविरुद्ध नायब तहसीलदार सिद्धार्थ शंकरराव धनजकर यांनी तक्रार दिली होती. त्यावरून सदरील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला असता, सदरील तरुण हा कॅनॉट प्लेस येथे एका मोबाइल च्या दुकानावर काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तरुणाला अटक केली व त्याला विचारपूस केली असता त्याने मतदान केल्याचा व्हिडिओ टिकटॉकवर वर व्हायरल केल्याचे सांगितले. मतदानाच्यावेळी वेळी मोबाईल सोबत घेऊन जाण्यास मनाई आहे. तरीदेखील काही तरुण मोबाईल फोन सोबत घेऊन जातात. मतदान करते वेळी व्हिडिओ तयार करत आहेत आणि तो व्हिडिओ एका ठराविक उमेदवाराला मतदान केल्याचा किंवा त्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पसरवत आहेत त्यामुळे एक प्रकारे गुप्ततेचा भंग होत आहे. टिकटॉक, व्हाट्सअप, फेसबुक लाईव्ह करून मतदान केल्याच्या घटना या लोकसभेच्या निवडणुकीत समोर आल्या होत्या याप्रकरणी संबंध देशात गुन्हे दाखल करण्यात आली आहे