पावसाची प्रतीक्षा कायम: सायंकाळी, उद्या हलक्या सरींचा अंदाज यंदा पाऊस कमीच ; चिंता वाढणार

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): जून महिना अर्ध्याहून अधिक संपत आला असला तरी यंदा पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी, नागरिक चिंतेत आहे. सर्वांचेच लक्ष  पावसाकडे लागले आहे. आज सायंकाळी आणि उद्या शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविला आहे.

शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. सध्या ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. आज सायंकाळी आणि उद्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. मात्र, व्यापक आणि जोरदार पावसाची शक्यता अद्याप कमी असल्याचे संकेत आहेत. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पावसाचे आगमन झाले नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मान्सून वेळेत दाखल होऊनही अनेक भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम झाला आहे. 

शेतकर्‍यांनी पेरणीसाठी शेतीची मशागत करून ठेवली असली तरी पावसाअभावी अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. दरवर्षी जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होत असल्याने शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर, मका आदी पिकांच्या पेरण्या करतात. मात्र यंदा काही ठिकाणी तुरळक सरी पडल्या असल्या तरी त्याचा शेतीला फारसा फायदा झालेला नाही. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी करण्यास शेतकरी धजावत नाहीत. यंदा बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमतीमुळे आधीच शेतकर्‍यांवर आर्थिक ताण आहे. अशा परिस्थितीत पेरणी केल्यानंतर पाऊस खंडित झाला तर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. काही भागांत विहिरी आणि शेततळ्यांतील पाणीसाठाही कमी झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

पावसाचा अंदाज
शहरात दिवसभर उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत तापमानात वाढ होत असून आर्द्रतेमुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. पावसाच्या सरी पडल्यास वातावरणात काहीसा गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे. आज २२ जून उलटला तरीही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे सर्वत्र पावसाची प्रतीक्षा लागली आहे. शेतकरी वर्ग मोठ्या प्रतीक्षेत आहे. आज सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी येतील असा अंदाज दिसून येत आहे. आज आणि उद्या देखील पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. यंदा पाऊस कमीच असेल असाही अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आणखी चिंतेत भर पडणार आहे.